चला समजून घेऊया झाडांची भाषा..
आपल्या आजूबाजूला हजारो प्रकारची झाडे दिसतात. त्यामध्ये आता वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. कधी असा प्रसंग आला आहे का कि तुमची चर्चा एखाद्या झाडाशी झालीये. किती चांगले झाले असते ना जर झाडे हि बोलली असती. आपल्यालाही झाडाशी संवाद साधता आला असता त्याची विचारपूस करता आली असती. मी जर असे म्हटले कि खरंच झाडेही आपल्यासारखी वागतात. भावनांची देवाणघेवाण करतात. परंतु त्याची भाषा आपल्याला समजेल असे नाही. वेगवेगळ्या मार्गानी झाडे हि एकमेकांशी संवाद करत असतात. जर त्याची सांकेतिक , रासायनिक भाषा जर आपल्याला समजली तर नक्कीच आपल्याला झाडांशी संवाद करता येईल.
खूप वर्षांचा अनुभव सोबत घेऊन प्रवास करणाऱ्या मुळ्या ( झाडांची भाषा) |
झाडांची वेगवेगळ्या माध्यमातून होणारी भावनांची देवाणघेवाण.
झाडांची भाषा
![]() |
Old Tree in jungle |
परिस्थिती /संवाद
जसे आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळे चढ-उतार येतात कधी कधी परिस्थिती खूप चांगली असते तर कधी कधी परिस्थिती वाईट असते. झाडांच्या बाबतीत ही असं काहीसं पाहायला मिळतात पण अशा परिस्थितीमध्ये झाडे एकमेकांच्या मदतीने परिस्थितीवर मात करतात. झाडे ही आपल्या पानांमध्ये तयार करत असणाऱ्या वेगवेगळ्या रासायनिक घटकांच्या माध्यमातून वेगवेगळे संकेत देत असतात. तसेच झाडांच्या फुलातून पसरत असणारा गंध हे पण एक प्रकारचे कीटकांसाठीचे निमंत्रणच असते. यामध्ये कीटकांना हवा असणारा मधुर मकरंद हा त्यांना दिला जातो व त्या बदल्यात त्यांच्याकडून परागीभवनाचे काम करून घेतले जाते. आता हा निसर्गाचा व्यवहार करण्याचा एक मार्ग आहे. यामध्ये झाडाचा इतर निसर्गातील घटकांसोबत असणारा संवाद पाहायला मिळतो.
कुटुंबातील सहकार्याची काळजी
ज्या पद्धतीने एखादा धोका दिसल्यास आपण त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज होतो तसेच एखाद्या कीटकांकडून असणारा खतरा जाणवल्यास झाडेही त्यांना तोंड देण्यासाठी सज्ज होतात. आता आपल्यासारखे हातपाय नसल्याकारणाने त्यांना कीटकांना उचलून बाजूला तर ठेवता येत नाही परंतु मुळाच्या व पानांच्या माध्यमातून वेगवेगळी रसायने बाहेर टाकून कीटकांना स्वतःपासून लांब नक्कीच ठेवता येते. शिवाय मुळामधून काही रसायने मातीमध्ये सोडली जातात यामधून झाडाचे जवळ असणारे सहकारी सुद्धा त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज होतात. जसे आपण आपल्या कुटुंबातील सहकार्याची काळजी घेतो त्याच पद्धतीने निसर्ग सुद्धा आपल्याजवळील सहकार यांची काळजी घेतो.
![]() |
Beetle on leaves |
स्वतःचे संरक्षण
चालताना जर समजा ठेच लागली आणि दुखापत झाली तर ती जखम पुढच्या येणाऱ्या काही कालावधीमध्येच भरून येते परंतु जर झाडाला जखम झाली तर काय होत असेल. ज्यावेळी झाडाच्या एका फांदीला दुखापत होते अशावेळी झाडाच्या त्या फांद्यांमधून विद्युत संकेत झाडाच्या इतर भागांकडे पाठवला जातो व दुखापत झालेली जागा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केला जातो अशावेळी झाडाच्या इतर भागातून अन्नद्रव्य व इतर घटकांचा पुरवठा त्या ठिकाणी पाठवला जातो. काही झाडे ही स्वतःचे संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वायू वातावरणामध्ये प्रसारित करतात.यामुळे त्यांच्यावर येणारा धोका तसेच त्यांच्या सहकार्यांसाठी पूर्व सूचना अशा प्रकारे दुहेरी कार्यक्रम चालतो.
![]() |
Plant healing |
संरक्षणासाठी बॉडीगार्ड
कधी कधी झाड स्वतःच्या संरक्षणासाठी बॉडीगार्ड सुद्धा नेमते. बाभळीचे झाड आणि मुंग्या यांच्यामध्ये असणारा करार. बाभळीच्या झाडाच्या बुंध्यामधून निघणारा द्रव पदार्थ हा मुंग्यांसाठी मेजवानीचा विषय असतो. व बदल्यात बाभळीच्या झाडाला मुंग्यांच्या माध्यमातून संरक्षण मिळते. ज्यावेळी बाभळीच्या झाडावरती एखाद्या प्राण्याचे आक्रमण होते त्यावेळी त्या ठिकाणी बाभळीच्या झाडांमधून काही रसायन बाहेर फेकले जातात हे रसायन मुंग्यांना त्या ठिकाणी आकर्षित करते अशा पद्धतीने आक्रमण झालेल्या ठिकाणी मुंग्यांचे संरक्षण प्राप्त होते. . भारी आहे ना. आपल्याला मिळेल का मुंग्यांचे संरक्षण साखरेच्या बदल्यात....?
मित्र कीटकांना हाक
कधी कधी ज्यावेळी संकट खूप मोठे असते त्यावेळी आपणही मदतीसाठी कोणाला तरी हाक नक्कीच मारतो. निसर्गामध्ये यापेक्षा वेगळे घडत नाही झाडांवरती जर संकट आलं तर अशावेळी झाड ही स्वतःच्या मदतीला इतर सहकाऱ्यांना किंवा मित्र कीटकांना बोलावतात. जसे की ज्यावेळी मक्याच्या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होतो त्यावेळी मक्याच्या झाडामधून काही रासायनिक रसायने सोडली जातात की जी मित्र किडींना बोलावतात. यामध्ये गांधील माशी चा समावेश होतो आता ही परजीवी गांधील माशी (parasitic wasp) आहे. त्या रसायनाच्या वासाने ही माशी मक्याच्या पिकावर आकर्षित होते व तिथे प्रादुर्भाव झालेल्या अळ्यांवरती फडशा पाडते. अशाप्रकारे झाडेही संकट काळी आपल्या मदतीला इतर मित्र कीटकांना हाक देतात.
![]() |
Beneficial insects |
नेटवर्क is net worth
आपण निसर्गामध्ये बघतो की मोठ मोठी जंगले वर्षानुवर्ष वाढतच चालली आहेत परंतु आपल्या घरापुढे लावलेलं एखादं झाड जगवता जगवता आपल्याला नाकी नऊ येते. मग निसर्गामध्ये वाढत असणारी एवढी झाडे यांना खतपाणी कोण घालत असेल. निसर्गामध्ये झाडांची गरज भागवण्याचे निसर्गाचे वेगळे सूत्र आहे जे मातीच्या अंतरंगातून चालते. मायकोरायझा नावाची बुरशी या सर्व अन्नद्रव्य पुरवठ्याचे नियोजन करते. हजारो लाखो वर्षापासून मातीमध्ये कार्यरत असणारी ही बुरशी कोणाला काय हवे काय नको याचे नियोजन करून झाडाच्या मुळापर्यंत अन्नद्रव्य पुरवठा करण्याचे काम करत असते. म्हणूनच डोंगर कपारी मध्ये वाढलेले झाड सुद्धा हिरवगार दिसतं. एखाद्या ठिकाणी एखाद्या अन्नद्रव्याची जर कमतरता असेल तर अशावेळी त्या अन्नद्रव्याची गरज ज्या ठिकाणी उपलब्ध असेल त्या ठिकाणाहून भागवण्याचे काम या बुरशीच्या माध्यमातून केले जाते. परंतु आजकाल सातत्याने केल्या जाणाऱ्या जमिनीच्या मशागतीमुळे या बुरशीचे नेटवर्क विस्कळीत झाले आहे. नेटवर्क नसणाऱ्या टॉवर सारखी सध्याची परिस्थिती आहे. परंतु निसर्गामध्ये म्हणजेच जंगलांमध्ये अजूनही नेटवर्क कायम आहे.
![]() |
Mushroom and plants |
ऍलेलोपॅथी
शाळेत असताना बेंचवर एकटे बसायला मजा यायची अशावेळी नंतर येणाऱ्यांना जागा दिली जायची नाही. ती गोष्ट लहान असतानाची होती परंतु मोठे झाले किती जागा काही लोकांसाठी आरक्षणाने घेतली. निसर्गामध्ये सुद्धा काही झाड स्वतःच्या वाढीसाठी लागणारी जागा ही आरक्षित करतात. जसे की काळे अक्रोडाचे झाड जेव्हा वाढते तेव्हा ते स्वतःच्या मुळांमधून जुगलॉन (juglon) नावाचे रसायन मातीमध्ये सोडते यामुळे त्याच्या आजूबाजूला दुसऱ्या कोणत्याही झाडाची वाढ होत नाही एक प्रकारे ते स्वतःची जागा संरक्षित करते व इतरांना वाढ होऊ देत नाही. काही झाडांमध्ये कदाचित ही मी पणाची भावना असेल. निसर्गातील या प्रक्रियेला ऍलेलोपॅथी असे म्हणतात.
![]() |
Walnut plant |
झाडांचा बुद्ध्यांक
झाडाच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश हा अत्यंत गरजेचा असतो कारण यावरच झाडाचे अन्न तयार होत असते आता सूर्यप्रकाश हा कोणत्या दिशेने येतो आहे हे झाडाला कसे समजते कारण झाडाला डोळे तर नाहीत इथे झाडाची संवेदना कामाला येते. जर तुम्ही एखादे झाड खिडकीमध्ये लावले असेल तर ते सूर्यप्रकाशाच्या दिशेने म्हणजेच खिडकीतून बाहेर डोकावते व जास्तीत जास्त सूर्यप्रकाश कसा मिळेल यासाठी प्रयत्न करते यालाच फोटोट्रॉफीजम (phototropism) असं म्हटलं जातं. विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये झाडे ही खूप उंच वाढतात कारण खूप गर्दी असणाऱ्या जंगलामध्ये प्रत्येक झाडाला सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करावी लागते व या स्पर्धेच्या नादात आपली उंची किती गेली याचे भान कदाचित झाडांना राहत नसावे त्यामुळे ते उंच वाढतात. खिडकीत लावलेल्या त्या रोपट्याला आपली योग्य दिशा कशी बर समजत असेल आपल्याकडे अजूनही काही लोकांना योग्य वाटा सापडल्या नाहीत ज्या आपल्याला प्रकाशाकडे घेऊन जातील. नक्कीच झाडांचा बुद्ध्यांक हा अधिक आहे हे मान्य करायला हरकत नाही.
झाडांना केला जाणारा स्पर्श हा जाणवतो
खड्यावरती ज्यावेळी आपण अनवाणी चालतो त्यावेळी पायाला रुतणारे खडे हे आपल्याला जाणवतात. त्याच पद्धतीने झाडाला केला जाणारा स्पर्श हा सुद्धा झाडांना जाणवतो यालाच थिग्मोमॉर्फोजेनेसिस (thigmomorphogenesis) असे म्हटले जाते. याचे उदाहरण द्यायचे म्हटले तर आपण सर्वांनी लाजाळूचे झाड पाहिले असेल लाजाळूच्या पानांना स्पर्श केला असता ती लगेच मिटून जातात. व थोड्या वेळानंतर पुन्हा पूर्ववत होतात म्हणजेच झाडांना केला जाणारा स्पर्श हा जाणवतो हे सत्य आहे. झाडेही या स्पर्शाच्या आधारावरती स्वतःमध्ये बदल करून घेत असतात. जर हवेचा वेग वाढत असेल तर अशावेळी झाड स्वतःमध्ये अधिक मजबुती आणण्याचा प्रयत्न करते जेणेकरून वाऱ्यामुळे त्याच्या फांद्यांना काही नुकसान होणार नाही तर काही झाडांमध्ये निसर्गतः अनुकूलन झालेले पाहायला मिळते.
![]() |
Mimosa pudica |
निसर्गतः झाडांमध्ये खूप वेगवेगळी रसायने पाहायला मिळतात जी झाडांचे संरक्षण इतर किडींपासून करतात जसे की मिरचीमध्ये कॅप्ससीन नावाचा घटक हा मिरचीचे संरक्षण कीटकांपासून करतो हा घटक अतिशय तिखट असून किडींना दूर ठेवण्यासाठी मदत करतो. शेवंतीमध्ये pyrethrin नावाचा घटक कीटकांपासून या झाडाचे संरक्षण करतो. तसेच तंबाखू मध्ये असणारा निकोटीन हा घटक कीटकांपासून झाडांचे संरक्षण करतो.
Frequently Asked Questions (FAQ)
झाडांची कोणती भाषा आहे का?
माणसांसारखी झाडांचे भाषा नाहीये झाडांची भाषा ही रासायनिक संकेत , विद्युत संकेत, उत्सर्जित केला जाणाऱ्या वेगवेगळ्या वायूंच्या स्वरूपात पाहायला मिळते.
झाड एकमेकांशी संवाद कसे साधते?
झाड एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या रसायनांचा वापर करते तसेच त्यांच्या वाढीमध्ये होणारे बदल त्यांच्या मुळामधून मातीमध्ये सोडली जाणारी वेगवेगळी रसायने. फुलांच्या व पानांच्या माध्यमातून येणारा गंध या भाषेमध्ये झाडे एकमेकांशी बोलतात
काय झाडांमध्ये व्यवहार होतात ?
होय नक्कीच निसर्गामध्ये सुद्धा आपल्याला व्यवहार पाहायला मिळतो जसे की बाभळीच्या झाडावरती चढणारे मुंगळे हे खाद्यासाठी झाडावर जातात तर इतर प्राण्यांपासून झाडाचे संरक्षण सुद्धा यांच्या माध्यमातून केले जाते तेव्हा इथे संरक्षणाच्या बदल्यात खाद्य असं समीकरण पाहायला मिळतं.